अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात…..
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मान्यता दिल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात १०० एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याने अंबरनाथकर आनंद व्यक्त करत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील सर्व्हे नंबर १६६/५ मधील आठ हेक्टर अर्थात अंदाजे २० एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीसाठी शासनाने ताब्यात घेतली आहे. या इमारत बांधकामासाठी ४०३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रत्यक्षात या जागेवर बांधकाम सुरू होण्यास विलंब असल्याने रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी पर्यायी
व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मान्यता दिली आहे. राज्यात एकूण दहा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला मान्यता दिली असून त्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे हे पाहिलं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असणार आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अंबरनाथच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला काही कमतरतेमुळे दिलेली मान्यता अमान्य केली होती. मात्र दुसऱ्या सुनावणीत ही मान्यता दिल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. लवकरच आता एमबीबीएस च्या १०० प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.