युक्रेन आणि रशियात सुरु असलेले युद्ध आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनकडून रशियात शिरुन हल्ले करण्यात आले आहेत. त्यानंतर आता युक्रेन रशियावर (Russia) मोठा हवाई हल्ला तयार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आता टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. व्लादिमीर पुतीन यांच्याकडून अणुबॉम्ब वापरण्यासंदर्भात चाचपणी सुरु असल्याचे समजते. रशियावर मोठा हवाई हल्ला झाल्यास पुतीन यांनी अणवस्त्रांचा वापर करण्याचा इशारा पाश्चात्य राष्ट्रांना दिला आहे. ब्रिटनकडून युक्रेनला नुकतीच संहारक अशी क्रुझ क्षेपणास्त्रे पुरवण्यात आली होती. युक्रेनने या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्यास रशियाच्या आतल्या भागांना थेट लक्ष्य केले जाऊ शकते. याची कुणकुण लागताच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्करी अधिकारी आणि सर्वोच्च सुरक्षा समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत अणवस्त्र वापरावर असलेले निर्बंध शिथील करण्याविषयी चर्चा झाली.
रशियाविरुद्धच्या युद्धात पाश्चात्य राष्ट्रांकडून युक्रेनला रसद पुरवली जात आहे. विशेषत: ब्रिटन आणि अमेरिका यांच्याकडून युक्रेनला घातक अशा क्रुझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला जात आहे. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, ब्रिटनने अलीकडेच युक्रेनला ‘स्ट्रॉर्म शॅडो’ ही घातक क्षेपणास्त्रे दिली होती. यु्क्रेनकडून रशियामधील प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यासाठी या घातक क्षेपणास्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टार्मर यांनी वॉशिंग्टनला जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीत रशियाविरुद्ध क्रुझ क्षेपणास्त्रे वापरण्याबाबत चर्चाही झाली होती.
रशियन गुप्तचर यंत्रणांना हल्ल्याची कुणकुण लागली
केर स्टार्मर आणि जो बायडन यांच्या भेटीनंतर युक्रेन पाश्चात्य राष्ट्रांनी पुरवलेल्या संहारक क्षेपणास्त्रांचा वापर करुन रशियावर हल्ला करु शकतो, याची कुणकुण पुतीन यांच्या गुप्तचर यंत्रणांना लागली होती. त्यामुळेच पुतीन यांच्याकडून रशियाच्या अणवस्त्र वापराबाबतच्या धोरणाचा आढावा घेण्यात आला आहे. पाश्चात्य राष्ट्र युक्रेनच्या मदतीला उतरल्यास रशियाला अणवस्त्रांच्या वापराबाबत आखून देण्यात आलेल्या निर्बंधांचा फेरविचार करावा लागेल, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.
रशिया हा आजघडीला सर्वाधिक अणवस्त्र असलेला देश आहे. रशिया आणि अमेरिका या दोन देशांकडे मिळून जगातील 88 टक्के अणवस्त्रे आहेत. पुतीन यांनीच चार वर्षांपूर्वी रशियाचे अणवस्त्र धोरण आखले होते. या धोरणानुसार रशियाला अणवस्त्र हल्ल्याचा धोका जाणवल्यास किंवा पारंपारिक युद्धात रशियाच्या अस्तित्त्वाला नख लागेल, अशी परिस्थिती उद्भवल्यास अणवस्त्रांचा वापर करता येऊ शकतो.